विठ्ठलराव व रुक्मिणीबाई यांना ९ सप्टेंबर १९०१ रोजी अपत्य झाले. मुलाचे नाव प्रताप असे ठेवण्यात आले. प्रतापच्या जन्मानंतर काहीच दिवसांनी विठ्ठलराव विलायतेस जाण्यासाठी निघणार होते. ते २१ सप्टेंबर १९०१ रोजी मुंबई येथून इंग्लंडला रवाना झाले. त्यांना सोडण्यासाठी त्यांचे आई-वडील, धाकटे बंधू एकनाथराव व बहीण जनाक्का इत्यादी कुटुंबीय मुंबईस गेले.
|
श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज |
विठ्ठलराव विलायतेस शिक्षणासाठी गेले असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत विठ्ठलरावांचे कोल्हापूरचे मित्र गोविंदराव सासने व वासुदेवराव सुखटणकर हे जनाक्कांच्या शाळेत वेळोवेळी येऊन विचारपूस करून जात.
असेच एकदा आले असता वासुदेवरावांनी आपल्या आईचे निधन झाल्याची बातमी जनाक्कांना सांगितली. जनाक्कांना वाईट वाटले. परंतु शांताचे आता कसे होणार ह्याची चिंता त्यांना वाटू लागली.
पुढच्या वेळी जेव्हा वासुदेवरावांची भेट झाली तेव्हा जनाक्कांनी शांतास हुजुरपागेत ठेवण्यास सांगितले. डॉ. रा. गो. भांडारकर यांचा परिचय असल्याने प्रवेश मिळणे शक्य होईल असे सांगितले. एवढेच नव्हे तर त्यांनी शांताची सर्व जबाबदारी घेण्याचे आश्वासनही दिले. वासुदेवराव तयार झाले. डॉ. भांडारकरांनीही परवानगी दिली. अशा रीतीने शांता हुजुरपागेत आली.
जनाक्कांचा शांताला सांभाळण्याचा निर्णय त्यांच्या आईवडिलांना तसेच मैत्रिणींना पटला नाही. परंतु जनाक्कांचा निर्धार मात्र पक्का होता. शांताबद्दल त्यांच्या मनात प्रचंड सहानुभूती होती. डॉक्टरांनी शांताच्या दुर्बल स्नायूंना जितका कामाचा सराव होईल तितका तो फायद्याचा ठरेल असे सांगितले होते. जनाक्का शांताची सर्व काळजी घेऊ लागल्या. तिला घास भरवणे, तोंड धुणे, तिच्या हाताला धरून बागेत फिरवणे त्याचबरोबर तिला घेऊन जात्यावर दळण दळणे, मुसळीवर मसाला कुटणे अशी कामे करत.
काहीच दिवसांनी जनाक्कांना शांताच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे जाणवून आले. त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यांचा उत्साह वाढला. त्या अजून मेहनत करू लागल्या. शांताच्या अंगास तेल लावून अंघोळ घालणे, रात्री हात-पायांची तेलाने मालिश करणे अशी कामे त्या करत. थोड्याच दिवसांनी शांताच्या प्रकृतीत अजून सुधारणा दिसू लागली. शांता बरीचशी स्वतःची कामे स्वतःच करू लागली. न अडखळता चालू लागली. पूर्वी घास भरवावा लागत पण आता तिला स्वतःला खायला येऊ लागले. इतकेच नव्हे तर पुढे पुढे तिने अभ्यासातही बरीच प्रगती केली. ती अतिशय सुंदर अक्षर काढू लागली. शिक्षिका इतर मुलींनाही तिच्यासारखे सुंदर अक्षर काढा म्हणून सांगू लागल्या. शांताचे सर्वत्र कौतुक होऊ लागेल. तिथल्या महिला अधीक्षक मिस्. सोराबजी यांना शांता म्हणजे आपल्या शाळेचे भूषण वाटू लागले. साहजिकच जनाक्कांमुळेच हे शक्य झाले असल्यामुळे त्यांचेही सर्वत्र कौतुक होऊ लागले.
बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी एकदा हुजूरपागा शाळेस भेट दिली. त्यावेळी मिस्. सोराबजींनी महाराजांना शांताची त्याचबरोबर जनाक्कांचीही माहिती करून दिली. जनाक्कांचे बंधू विठ्ठलराव हे विलायतेस धर्मशिक्षण घेण्यासाठी गेल्याचेही सांगितले. महाराजांनी कौतुकाने जनाक्कांकडे पाहिले. विठ्ठलरावांना विलायतेस जाण्यासाठी महाराजांनीच आर्थिक सहाय्य केले होते. जनाक्कांच्या प्रयत्नांमुळेच शांता ही आजारातून बरी झाली ही गोष्ट महाराजांना समजताच त्यांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी मोठ्या आपुलकीने जनाक्कांची विचारपूस केली. आपण ज्या विद्यार्थ्यास विलायतेस जाण्यास आर्थिक साहाय्य केले त्याची बहीणसुद्धा जनसेवा करण्यास तयार आहे याचे त्यांनी मिस्. सोराबजींजवळ कौतुक केले. शांतासाठी आपण घेतलेल्या श्रमाचे चीज झाल्याने जनाक्कांना खूप समाधान वाटत होते.
शांता आजारातून बरी होऊन प्रगती करत होती परंतु नियतीने मात्र तिच्या बाबतीत वेगळेच काहीतरी योजले होते. दोन वर्षांनी तिला क्षयाची बाधा झाली. क्षय हा संसर्गजन्य विकार असल्यामुळे तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. तिची भेट घेण्यास इतरांना मनाई करण्यात आली. त्यामुळे शांता आणि जनाक्का यांची एक-दोन वेळाच भेट होऊ शकली.
संदर्भ :
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य - गो. मा. पवार, (चौथी आवृत्ती) मनोविकास प्रकाशन
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्मय खंड २ – संपादक : गो. मा. पवार / रणधीर शिंदे (पहिली आवृत्ती) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई